शरदचंद्रजी पवार विद्यालयातील व्याख्यानमालेचे तिसरे व्याख्यानपुष्प उत्साहात संपन्न
कोरेगाव भीमा :
श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय, वढू बुद्रुक येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेतील तिसरे व्याख्यानपुष्प ‘विद्यार्थी सुरक्षितता मार्गदर्शन कार्यक्रम’ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमात शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षितता, शालेय शिस्त, आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची काळजी, कायदे, सायबर सुरक्षितता तसेच वाहतूक नियम याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी मोबाईल व सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा, अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे तसेच कोणतीही अनुचित घटना किंवा अडचण निर्माण झाल्यास न घाबरता पालक, शिक्षक अथवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. यादव यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि पोलीस यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे, असा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमास श्री. कुंजीर, संदीप कारंडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ शंकरराव चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ भंडारे, विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद तसेच वढू गावचे विद्यमान पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम विद्यालयात घडवून आणण्यासाठी पोलीस पाटील जयसिंग भंडारे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या मोलाच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनातील अनुभवी अधिकाऱ्यांकडून थेट मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचे विद्यालय प्रशासनाने कौतुक केले.
विशेष म्हणजे या मार्गदर्शन कार्यक्रमास पालकांचीही उल्लेखनीय उपस्थिती लाभली. आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेविषयी पालकांनी दाखविलेला उत्स्फूर्त सहभाग हा कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
विद्यार्थ्यांनीही मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुरक्षिततेशी संबंधित विविध बाबी समजून घेतल्या. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव, आत्मविश्वास, शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने व्याख्यानमालेतील हे तिसरे व्याख्यानपुष्प अत्यंत उपयुक्त व दिशादर्शक ठरले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक एकनाथ शंकरराव चव्हाण, पाहुण्यांचे स्वागत सोमनाथ बबन भंडारे, सूत्रसंचालन पोपट वनवे तर आभार हरीश शिंदे यांनी मानले


Post a Comment
0 Comments