कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने शिरूर तालुक्यातील पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले अनेक बंधारे कोरडे पडले आहेत. परिणामी, शेतीच्या सिंचनासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर घोड धरणातून घोड नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये ३५० दशलक्ष घनफूट (MCFT) पाणी सोडण्यात यावे, अशी प्रमुख मागणी शिरुर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कुकडी-घोड कालवा सल्लागार समितीच्या मुंबई येथील बैठकीत केली.
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत दिलासा मिळावा, शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे आणि उभ्या पिकांचे नुकसान टाळता यावे, यासाठी घोड नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडणे आवश्यक असल्याचे आमदार कटके यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. तसेच, डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यांमधून एकाच वेळी पाणी सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी
सध्या पाणीटंचाईबरोबरच शेतीच्या वीजपुरवठ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. खरीप हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना खंडित झालेला वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतीसाठी दररोज किमान चार तास अखंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी आमदार कटके यांनी केली. पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत हातातोंडाशी आलेला घास जळून जाऊ नये, यासाठी तातडीने आवश्यक निर्णय घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
घोड धरणातील गाळ काढण्याचा मुद्दाही उपस्थित
घोड धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे धरणाच्या पाणीसाठवण क्षमतेत सुमारे १.६६ टीएमसीने घट झाल्याची बाबही आमदार कटके यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली. धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतल्यास पाणीसाठवण क्षमता वाढण्यास मदत होईल. त्याचा लाभ पुणे आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांतील शेती व पाणीपुरवठ्याच्या नियोजनाला होऊ शकतो. त्यामुळे धरणातील गाळ काढण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शिरूर तालुक्यातील शेतकरी सध्या पाणीटंचाईच्या गंभीर संकटाचा सामना करत आहेत. या परिस्थितीत सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देणे, वीजपुरवठा सुरळीत करणे आणि धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही व्हावी, यासाठी आमदार माऊली कटके यांनी बैठकीत पाठपुरावा केला.


Post a Comment
0 Comments