वाहतुकीच्या मार्गात प्रायोगिक बदल; रस्त्यावरील अडथळे हटवून नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ
कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा येथील मुख्य चौकात निर्माण झालेल्या मोठ्या वाहतूक कोंडीची शिक्रापूर पोलिसांनी तातडीने दखल घेतली असून, वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी नव्याने नियोजन करण्यात आले आहे. पितृपंधरवड्यामुळे वाढलेली वाहनांची वर्दळ, भीमा नदी पुलाजवळील मच्छी विक्री, आळंदी फाट्यावर झालेली कोंडी आणि त्यानंतर विरुद्ध दिशेने वाहने घुसल्याने चौकातील वाहतुकीचा गोंधळ वाढला होता.
या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा चौकातील वाहतुकीच्या मार्गात प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आला आहे. वढूकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना चौकातून डावीकडे वळवून नगर रोडवरील हॉटेल ग्रीन गार्डनसमोरून यू-टर्न घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्रापूरकडून वढूकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पेरणे फाटा येथील नदीचा पूल ओलांडल्यानंतर यू-टर्नची व्यवस्था करण्यात आली आहे. डिग्रजवाडी फाटा बंद करून त्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना ग्रीन गार्डनसमोरून वळण्याचे, तर डिग्रजवाडीकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांना पेरणे फाट्यावरून यू-टर्न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गणेश भुवन हॉटेलसमोरील मार्ग दुचाकींसाठी खुला ठेवण्यात आला असून, तेथे ट्रॅफिक वॉर्डन तैनात राहणार आहेत. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या आणि बाजारातील विक्रेत्यांना रस्त्यापासून आत हलविण्यात आले आहे. वडापाव, फळे व खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे रस्ता व्यापला जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. चौकात रिक्षा उभ्या करण्यास मनाई करून त्यांच्यासाठी पोलीस चौकीमागील मोकळी जागा निश्चित करण्यात आली आहे. चौकाच्या कॉर्नरवर होणारे बेशिस्त पार्किंग तसेच रस्त्यावरील अतिक्रमणावरही कारवाई केली जात आहे.
हॉटेल ग्रीन गार्डनसमोर दोन्ही बाजूंना रंबलर व स्पीड ब्रेकर उभारण्यासाठी संबंधित विभागांना पत्रव्यवहार करण्यात आला असून, काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर तेथील बॅरिकेड्स हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी वढू चौक, कोरेगाव येथे दररोज एक ट्रॅफिक अंमलदार नियुक्त करण्यात आला आहे. आणखी एका ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, गर्दीच्या काळात आवश्यकतेनुसार बॅरिकेटिंग व मनुष्यबळाचा वापर केला जाणार आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांशीही समन्वय साधण्यात आला असून, शहर हद्दीतील वाहतुकीचा परिणाम कोरेगावकडे होऊ नये यासाठी परस्पर संपर्क ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, करण्यात आलेले बदल प्रायोगिक स्वरूपाचे असून, वाहतुकीच्या प्रत्यक्ष स्थितीनुसार त्यात आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहतुकीसंदर्भातील सूचना किंवा समस्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेशाद्वारे कळविता येणार आहेत.
या उपाययोजनेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, हनुमंत गिरी, पोलीस अंमलदार विकास सरोदे, नवनाथ नायकडे, श्रावण गुप्ते, ट्रॅफिक अंमलदार लखन शिरस्कर, मिलिंद देवरे, वीरेंद्र सुंबे आणि ट्रॅफिक वॉर्डन जमादार पवार सहभागी झाले.
कोरेगाव भीमा येथील वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेले बदल नागरिकांच्या सोयीसाठी आहेत. प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करून त्यात आवश्यक ते बदल केले जातील. नागरिकांनी वाहतुकीसंदर्भातील अडचणी अथवा सूचना थेट पोलिसांपर्यंत पोहोचवाव्यात. स्थानिक यंत्रणा, पत्रकार आणि नागरिकांच्या सहकार्याने वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- चंद्रशेखर यादव (पोलिस निरीक्षक)

Post a Comment
0 Comments