Type Here to Get Search Results !

वाघोली महावितरणचा ग्रामीणमधून शहरी विभागात समावेश



आमदार माऊली आबा कटके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

वाघोली : प्रतिनिधी

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, वाघोली परिसरातील महावितरणच्या तीन शाखांचा ग्रामीण विभागातून रास्तापेठ शहर मंडळांतर्गत समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे वाघोली आणि परिसरातील वीज वितरण व्यवस्थेचे प्रशासकीय नियंत्रण शहरी विभागाकडे वर्ग झाले असून, वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण मंडळ कार्यालयांतर्गत मुळशी विभागातील हडपसर ग्रामीण उपविभागात समाविष्ट असलेल्या वाघोली, साईसत्यम आणि विठ्ठलवाडी-वाघोली या तीन शाखांचा कार्यभार आता रस्तापेठ शहर मंडळ कार्यालयांतर्गत नगररोड विभागातील विश्रांतवाडी उपविभागाकडे सोपविण्यात आला आहे.

यामध्ये वाघोली शाखेतील २५ हजार ६६५, साईसत्यम शाखेतील २७ हजार ७५९ आणि विठ्ठलवाडी-वाघोली शाखेतील २४ हजार ९०२ अशा एकूण ७८ हजार ३२६ वीज ग्राहकांचा समावेश आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्येतील वाढ आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेता, या शाखांचा शहरी विभागात समावेश होणे महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

वाघोली आणि परिसरातील नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्या, तक्रारींचे निराकरण, देखभाल-दुरुस्ती आणि प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम पद्धतीने व्हावे, या दृष्टीने आमदार माऊली आबा कटके यांनी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने परिसरातील वीज ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

वाघोली परिसरात वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा आणि मूलभूत सेवा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महावितरणच्या या तीन शाखांचा शहरी विभागात समावेश होणे हे महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे वीज वितरण व्यवस्थेचे नियोजन, प्रशासकीय समन्वय आणि ग्राहक सेवेत सुधारणा होण्यास मदत होऊ शकते.

महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मासं) भूषण कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने १७ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वाघोली परिसरातील वीज वितरण व्यवस्थेला शहरी विभागाच्या प्रशासकीय चौकटीत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

आमदार माऊली आबा कटके म्हणाले, वाघोलीची लोकसंख्या आज जवळपास ५ लाखांच्या आसपास पोहोचली आहे, तर वीज ग्राहकांची संख्याही १ लाखाच्या पार गेली आहे. नागरीकरण वेगाने होत असताना वाघोलीला ग्रामीण ढाच्यातून बाहेर काढून शहरी सुविधा मिळवून देणे गरजेचे होते. यासाठी माझा महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि ऊर्जा मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर वाघोलीच्या तीन शाखांचा शहर विभागात समावेश झाला आहे. यामुळे वाघोलीला अतिरिक्त मनुष्यबळ आणि निधी मिळेल. तसेच, लवकरच येथे स्वतंत्र उपविभाग कार्यालय निर्माण करण्यासंदर्भात ही प्रस्ताव मुंबई कार्याकडे पाठवला आहे त्यामुळे  वाघोलीकरांना वीज बिल दुरुस्ती, नवीन कनेक्शन किंवा इतर तक्रारींसाठी इतरत्र जावे लागणार नाही, सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतील. वाघोलीकरांचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

– आमदार, शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघ.

Post a Comment

0 Comments