उजनी जलाशयातील ऊर्जा प्रकल्पांना स्थानिकांचा तीव्र विरोध; शेतकरी व मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर
बारामती प्रतिनिधी : शंकर भिसे
उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकरी, मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पांमुळे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. उजनी जलाशय परिसरात प्रस्तावित असलेल्या १ लाख ६५ हजार १५५ कोटी रुपयांच्या एआय डेटा सेंटर, तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, हरित हायड्रोजन आणि लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या प्रकल्पांना स्थानिक शेतकरी व मच्छीमारांकडून विरोध दर्शविण्यात येत आहे.
उजनी धरण हे पुणे, सोलापूर आणि परिसरातील शेती, पिण्याचे पाणी तसेच मच्छीमारांच्या उदरनिर्वाहासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या जलाशयावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक व ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आल्यास पाण्याच्या उपलब्धतेवर, पर्यावरणावर तसेच पारंपरिक व्यवसायांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे मच्छीमारांच्या व्यवसायावर संकट
उजनी जलाशयात प्रस्तावित तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे मच्छीमारांच्या पारंपरिक मासेमारी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आहे. जलाशयातील मोठा भाग सौर पॅनेलने व्यापला गेल्यास मासेमारीसाठी उपलब्ध क्षेत्र कमी होऊ शकते. तसेच जलचरांच्या अधिवासावर आणि पर्यावरणाच्या समतोलावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याला प्राधान्य द्या!
उजनी धरणातील पाण्याचा वापर प्रथम शेती, पिण्याचे पाणी आणि स्थानिक नागरिकांच्या गरजांसाठी व्हावे.

Post a Comment
0 Comments