भोर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
भोर तालुक्यातील हिरडस मावळासह आंबवडे खोऱ्यास शनिवारी (ता. ३१) पहाटे तीन तास पडलेल्या पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे भात पिकाचे होत्याच नव्हते झाले. पावसाचे प्रमाण एवढे होते की, खाचरे पाण्याने तुडुंब भरली. कापलेले भात पीक पाण्यावर तरंगत होते. भात पूर्ण भिजल्याने वाया गेले. यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला असल्याने भात उत्पादक हतबल झाला आहे.
भोर तालुक्यात दुष्काळामुळे भातशेती करपून गेल्याने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी कृषिपंप, टँकर आदींच्या साहाय्याने पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी धडपड केली होती. दुष्काळातून व पाणी देऊन वाचलेल्या पिकाची शेतकऱ्यांनी कापणी केली होती. परंतु शनिवारी (ता.३१) पहाटे पडलेल्या पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे शासनाने नुकसानीची त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पावसामुळे भिजल्याने तांदूळही काळा पडणार असून पेंढ्यांचेही नुकसान होणार आहे. तसेच उभ्या पिकांचे दाणे मुसळधार पावसात झडून गेले आहेत. भातासह झेंडू पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याने शासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित मदत करावी, अशी मागणी शेतकरी बाबाजी साळेकर (साळव), अंकुश मादगुडे (भावेखल), नितीन जेधे (आंबवडे), नितीन कुडले (करंजे) यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments