Type Here to Get Search Results !

श्रीकांत पाटोळे यांच्या पुढाकार तसेच लोक सहभागातून केसनंद वाडेबोल्हाई पशुवैद्यकीय चिकित्सालयाला गाई उचलण्याचा पाळणा उपलब्ध



वाडेबोल्हाई : गजानन गव्हाणे पाटील

शेतकऱ्यांची खरी संपत्ती आणि लक्ष्मी मानल्या जाणाऱ्या गाई-म्हशी आजारपणामुळे किंवा अन्य कारणांमुळे खाली बसल्यास त्यांना पुन्हा उभे करणे पशुपालकांसमोर मोठे आव्हान असते. अशा वेळी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या उपचारात अडथळे निर्माण होतात, तर पशुपालकांना आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी वाडेबोल्हाई येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाला लोकसहभागातून गाई-म्हशी उचलण्यासाठी विशेष पाळणा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

केसनंद, ता. हवेली येथील युवा उद्योजक श्रीकांत सुभाष पाटोळे यांच्या पुढाकारातून तसेच तळेरानवाडी आणि केसनंद येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम साकारण्यात आला. जिल्ह्यात पशुधनाच्या संरक्षणासाठी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारा हा पहिलाच उपक्रम असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आजारपणामुळे किंवा अशक्तपणामुळे उठू न शकणाऱ्या गाई-म्हशींना या विशेष पाळण्याच्या साहाय्याने सुरक्षितपणे उभे करता येणार आहे. त्यामुळे जनावरांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार असून पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कामही अधिक सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे, जनावरांचे प्राण वाचविण्यासोबतच पशुपालकांचे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शासकीय यंत्रणेवरील अवलंबित्व कमी करून लोकसह भागातून ग्रामीण भागातील पशुसंवर्धन सेवेला बळ देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. सामाजिक बांधिलकी जपत उद्योजक आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन पशुधनाच्या संरक्षणासाठी उचललेले हे पाऊल इतर गावांसाठीही दिशादर्शक ठरणार आहे.

या वेळी वाडेबोल्हाईच्या सरपंच पल्लवी शिंदे, केसनंदचे माजी सरपंच बाबासाहेब हरगुडे, सामाजिक कार्यकर्ते योगेश हरगुडे, अनिल हरगुडे, सचिन हरगुडे, चेअरमन गणेश हरगुडे, सुनील हरगुडे, पत्रकार विजय लोखंडे, शंकर पाटोळे तसेच पशुधन पर्यवेक्षक अविनाश गवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसहभागातून उभारलेल्या या सुविधेमुळे वाडेबोल्हाई पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, पशुधनाच्या संरक्षणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments